संगीत मानापमान
आज संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर तशी free च होते मी. एखादं पुस्तक घेऊन वाचत बसावं असा विचार करत असताना मला माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे दीदी यांचा फोन आला. "अगं अनुश्री, संह्याद्री लाव आपलं नाटक "संगीत मनापमान" लागलं आहे. तुला चंदू डेगवेकर नानांना बघायचं आहे ना? लवकर लाव बरं नाटक!" अर्थात क्षणाचाही विलंब नं करता मी संह्याद्री लावलं. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या तेजस्वी लेखणीतून अवतरलेलं आणि गोविंदराव टेंबे यांच्या संगीताचं लेणं ल्यालेलं अजरामर नाटक "संगीत मानापमान"!
नाटक लावल्या लावल्या ऐकायला मिळालं ते "धैर्यधरांचं" "चंद्रिका ही जणू". माझे गुरु डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका आणि धैर्यधरांची सर्वच पदे आम्हां सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुखद पर्वणीचं असते. "मा. दीनानाथ मंगेशकर" यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका, आणि धैर्यधरांची पदे, यांबद्दल आम्ही आमच्या गुरुजींकडून नेहमीच ऐकत आणि शिकत असतो. मा. दीनानाथ मंगेशकरांचा अलौकिक दैवी सुर साऱ्या विश्वावर राज्य करीत आहे. "चंद्रिका ही जणू", "या नवंनवल नयनोत्सवा", "शूरा मी वंदिले", "रवी मी" ही सर्वच पदे ऐकत ऐकत लहानाचे मोठे झाल्यामुळे आम्हां सर्व विद्यार्थ्यांना आमच्या आयुष्याचं सार्थक झालं असंच वाटतं.
आमच्या वंदना दीदी म्हणजेच मनापमान ची "भामिनी". दीदींना रंगमंचावर पाहिलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते एक वेगळाच आनंद मिळतो. आणि दीदींची "भामिनी" म्हणजे खूपच सुंदर आणि आंनददायक असते. "नटसम्राट बालगंधर्वांनी" अजरामर केलेली भामिनी आणि भामिनीची पदे. "धनी मी पती वरीन कशी अधना", "खरा तो प्रेमा", "मी अधना नं शिवे भीती मना" आणि masterpiece म्हणजे "नाही मी बोलतं नाथा" ही पदे म्हणजे एक सुरेल नजराणाच! आमच्या दीदींकडून "नाही मी बोलतं नाथा" ऐकताना खूपच आनंद मिळतो.
नाटकातले लक्ष्मीधरजी म्हणजेच मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते "चंदू डेगवेकर नाना". गुरुजींकडून आणि दीदींकडून नानांबद्दल अनेकदा ऐकायला मिळतं. आज संह्याद्री वाहिनी वर नानांना पहायला मिळालं. अश्या ज्येष्ठ व्यक्तींचा रंगमंचावरचा वावर आणि त्यांचा अभिनय बघून भरून पावल्यासारखं वाटतं. गुरुजींच्या कृपाशीर्वादामुळे या सर्व ज्येष्ठ रंगकर्मीचे आशीर्वाद आम्हाला लाभत आहेत. हेच भाग्य आमचं. काही त्रुटी असल्यास क्षमा असावी.
या नाटकाचे पुनःप्रक्षेपण उद्या दुपारी १:३०वाजता संह्याद्री वाहिनी वर आहे. सर्व रसिकांनी या नाटकाचा नक्कीच आस्वाद घ्यावा.
उद्या म्हणजेच २४ एप्रिल मा. दीनानाथ मंगेशकरांचा ७९ वा स्मृतिदिन, मा. दीनानाथ मंगेशकर आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या सुरेल दैवी स्मृतींना विनम्र अभिवादन!
गुरुचरणी सादर वंदन!
- अनुश्री पानसे
२३/०४/२०२१
👌👌👌🙏🙏🙏
ReplyDelete🙌🏻🙏🏻👌🏻
ReplyDelete