कैवल्यगान
असं म्हणतात की आपल्यासारखंच समांतर जीवन लाभलेलं कुणीतरी आल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. जोपर्यंत असं कोणी येत नाही तोपर्यंत ही जीवनयात्रा अशीच चालू राहते. प्रतीक्षा करत करत. की अपेक्षा करत करत? अनेक क्षयही होतात. पण मोक्ष की काय म्हणतात ना त्याची वाट बघताना असे कितीतरी जन्म घ्यावे लागतात. जीवनचक्राच्या रगाड्यात गुरफटून जावं लागतं, फक्तं मोक्षाच्या अपेक्षेत!
ऐहिक! परलोकापासून लांब करणारा आणि इहलोकी गुंतवणारा एक धागा! प्रीतीचे, कीर्तीचे असे अनेक पाश असतात, ज्यात अडकून पडतो आपण. हे हि एका प्रकारचं ऐहिकच असतं ना? या ऐहिकाचा मोह जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परतत्त्वाचा स्पर्श होत नाही. आणि जेव्हा तेच परतत्त्व स्पर्शू लागतं तेव्हा युगांपासून जोडलेली नाती, जमवलेली संपत्ती, जुळलेले (मैत्रीचे, प्रीतीचे) धागे, पाहिलेली - रंगवलेली स्वप्नं, सुख - दुःख - राग - लोभ - द्वेष - मत्सर अश्या अनेक भावना, मनातल्या सर्व कल्पना या सगळ्यांचं संचित क्षणार्धात नजरेसमोरून तरंगत जातं. पण तेव्हा.. तेव्हा मात्र सगळेच पाश तुटलेले असतात. आणि नवीन वाटचाल सुरु झालेली असते. फरक एवढाच की बाकी भौतिक वाटचालीप्रमाणे हि नसते! कारण भौतिक सुखांचा केव्हाच विसर पडलेला असतो. ते जीवन केव्हाच मागे टाकलेलं असतं!
मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय? संसारिक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती! सर्व भौतिक पाश तोडून संसारिक दुःखाचा कायमस्वरूपी नाश जेव्हा होतो तेव्हाच मोक्षाचा मार्ग दिसतो. एक खूप सुंदर शब्द आहे - कैवल्य! कैवल्य म्हणजे काय? जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन!
एखादी मैफिल चालू असेल तर त्या सुरांनी भारावून गेलेलं वातावरण कसं असतं? सगळी काळजी, चिंता विसरून मन कसं त्या सुरांशी एकरूप होऊन जातं. स्वतःचं भानही राहत नाही. सुरांमध्येच हरवून जायला होतं. मैफिल संपल्यानंतरही, जरी भौतिकरित्या कानाला ऐकू येत नसलं तरीही मनाला स्पर्शून गेलेलं ते सूर, ताल, लयीचं अस्तित्वच सांगून जातं की अगदी काहीच क्षणांपूर्वी याच रंगमंचावर एक बहारदार अशी मैफिल रंगली होती. अगदी तसंच आहे हे. आयुष्याच्या रंगमंचावर रंगत जाणारी मैफिलच असते ना ही..? एका कोणत्यातरी निमिषमात्रात सगळ्या ऐहिकाचा विसर पडतो आणि हा जीवात्मा त्या परमात्म्याशी एकरूप होतो. ही मैफिल संपते खरी.. पण भौतिकरित्या दिसत नसलं तरीही मनाला स्पर्शून जाणारं ते कैवल्याचं चैतन्य मात्र सांगून जातं, अगदी काहीच क्षणांपूर्वी याच रंगमंचावर एक बहारदार अशी मैफिल रंगली होती! आणि सतत कानावर पडत राहतात त्या समेवर येऊ पाहणाऱ्या कैवल्यगानाचे सूर....
© - स्वर_अनुश्री
२३/१२/२०२०
Something different and unique to read❤️
ReplyDeleteVery deep and heart touching ❤️
ReplyDeleteVery well written as always Anu, keep it up. खूप अर्थपूर्ण लिहिलंय.
ReplyDeleteAmazing thoughts..kudos
ReplyDeleteKhup sundar❤❤❤
ReplyDeleteThat's really something different and has a deep meaning in itself.... Geart one!! Keep writing dii
ReplyDeleteThat's really something different and has a deep meaning in itself.... Geart one!! Keep writing dii
ReplyDeleteKeep Writing, great one!
ReplyDelete