कैवल्यगान
असं म्हणतात की आपल्यासारखंच समांतर जीवन लाभलेलं कुणीतरी आल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. जोपर्यंत असं कोणी येत नाही तोपर्यंत ही जीवनयात्रा अशीच चालू राहते. प्रतीक्षा करत करत. की अपेक्षा करत करत? अनेक क्षयही होतात. पण मोक्ष की काय म्हणतात ना त्याची वाट बघताना असे कितीतरी जन्म घ्यावे लागतात. जीवनचक्राच्या रगाड्यात गुरफटून जावं लागतं, फक्तं मोक्षाच्या अपेक्षेत! ऐहिक! परलोकापासून लांब करणारा आणि इहलोकी गुंतवणारा एक धागा! प्रीतीचे, कीर्तीचे असे अनेक पाश असतात, ज्यात अडकून पडतो आपण. हे हि एका प्रकारचं ऐहिकच असतं ना? या ऐहिकाचा मोह जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परतत्त्वाचा स्पर्श होत नाही. आणि जेव्हा तेच परतत्त्व स्पर्शू लागतं तेव्हा युगांपासून जोडलेली नाती, जमवलेली संपत्ती, जुळलेले (मैत्रीचे, प्रीतीचे) धागे, पाहिलेली - रंगवलेली स्वप्नं, सुख - दुःख - राग - लोभ - द्वेष - मत्सर अश्या अनेक भावना, मनातल्या सर्व कल्पना या सगळ्यांचं संचित क्षणार्धात नजरेसमोरून तरंगत जातं. पण तेव्हा.. तेव्हा मात्र सगळेच पाश तुटलेले असतात. आणि नवीन वाटचाल सुरु झालेली असते. फरक एवढाच की बाकी भौतिक वाटचालीप्रमाणे हि न...